
साहित्य:
४-६ छोटी वांगी
१ ते दिड कप खवलेला ओला नारळ
पाउण वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
३-४ लाल सुक्या मिरच्या/ लाल तिखट चवीनुसार
२ चमचे तिळ
१ चमचा जिरेपूड
२ चमचे गोडा मसाला
२-३ चमचे किसलेला गूळ
३ चमचे चिंचेचा घट्ट कोळ
फोडणीचे साहित्य : मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट
मीठ
तेल
कृती:
१) सारणासाठी नारळ, शेंगदाण्याचा कूट, तिळ, गोडा मसाला, लाल मिरच्या एकत्र करून फ्राईंग पॅनमध्ये तेल न घालता एक दोन मिनीटे परतावे.आणि मिक्सरमध्ये बारीक करावे म्हणजे सारण मिळून येईल.
२) चिंचेच्या कोळात किसलेला गूळ घालून मिक्स करावे. गूळ विरघळला कि ते मिश्रण सारणात घालावे. मिठ, जिरेपूड घालावी.
३) वांगी स्वच्छ धुवून त्याच्या दांड्या बघाव्यात, जर त्यावर काटे असतील तर काटे कापून टाकावे. वांग्याला वरून अधिक चिन्हासारखे काप द्यावेत, पण पूर्ण कापून फोडी करू नयेत. कारण आपल्याला वांग्यात सारण भरायचे आहे.
४) सारण वांग्यात भरावे. थोडे सारण ग्रेव्हीसाठी बाजूला काढून ठेवावे. कढईत २-३ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, थोडे लाल तिखट घालून फोडणी करावी. बाजूला काढून ठेवलेली ग्रेव्ही घालावी, थोडे पाणी घालावे पाण्यात थोडे मिठ घालावे ज्यामुळे वांग्याच्या आत थोडे मिठ मुरेल. अलगदपणे भरलेली वांगी घालावीत. वरून झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढावी. वाफ काढताना मधेमधे वांगी पलटावीत.
५) सुरीने वांगी शिजली आहेत कि नाही हे तपासून घ्यावे. भाकरी किंवा गव्हाच्या पोळीबरोबर भरली वांगी मस्तच लागतात.
टीप: १) बाजारातून वांगी घेताना कोवळी, आकाराने छोटी वांगी घ्यावीत.
२) जर वांगी कढईत शिजवण्यासाठी वेळ नसेल तर कूकरमध्ये २ शिट्या कराव्यात. पण कूकरपेक्षा बाहेर शिजवलेली वांगी जास्त चविष्ट लागतात.
३) जर कांदा आवडत असेल तर फोडणीत बारीक चिरलेला थोडा कांदा परतावा. आणि मग वांगी घालावीत.
Labels:
Stuffed Eggplant, Maharashtrian Eggplant recipe, Eggplant recipe, Brinjal recipe, Spicy Eggplant recipe
0 comments:
Post a Comment