Pages

Showing posts with label Sankrant. Show all posts
Showing posts with label Sankrant. Show all posts

ज्वारीची भाकरी - Jwarichi chi Bhakari

Jowar Bhakari in English

वेळ: २५ मिनीटे
वाढणी: ४ ते ५ मध्यम भाकर्‍या

bhakri, bhakari, millet roti, jwarichi bhakri, indian roti recipeसाहित्य:
२ कप ज्वारीचे पिठ
अंदाजे दिड ते दोन कप गरम पाणी
१ टेस्पून लोणी किंवा तूप
१/४ टिस्पून मिठ
१/२ ते पाऊण कप ज्वारीचे पिठ भाकरी थापायला किंवा लाटायला

भोगीची भाजी रेसिपी

कृती:
१) पातेल्यात पाणी गरम करून त्यात १ टेस्पून लोणी सोडावे. पाणी चांगले गरम झाले कि परातीत ज्वारीचे पिठ आणि मिठ घालून मिक्स करावे. त्यात पाणी बेताबेताने ओतावे. हळू हळू मिक्स करून मळावे. पिठ चांगले मळले गेले पाहिजे.
२) मळलेल्या पिठाचे ४ किंवा ५ गोळे करावे व लगेच भाकरी करण्यास घ्यावी.
३) तवा गरम झाला कि गॅस मिडीयम हाय हिटवर ठेवावा. मळलेल्या पिठाचा गोळा कोरड्या पिठात बुडवून हलक्या हाताने लाटावा (टीप १). लागल्यास अजून थोडे कोरडे पिठ घ्यावे. भाकरी मध्यमसर जाड ठेवावी.
४) भाकरी तव्यावर टाकावी. वरच्या बाजूने हाताने किंवा सुती कापडाने पाणी लावावे. पाणी सुकत आले कि भाकरी पलटावी व दुसर्‍या बाजूने भाजावी. (महत्त्वाची टीप २)
गरमागरम भाकरीवर लोणी घालून झुणका, पिठलं किंवा वांगं-बटाटा-कांदा अशा मिक्स रस्सा भाजीबरोबर छान लागते.

टीप:
१) भाकरी थापूनही करू शकतो. पिठाचा गोळा थोड्या जास्त पिठावर हलके हलके थापावा व भाकरी वाढवत न्यावी.
२) माझ्या घरी इलेक्ट्रिक स्टोव्ह कॉईल असल्याने आचेवर भाजता येत नाही. पण घरी विस्तवाची (flame) शेगडी असेल तर भाकरीची एक बाजू तव्यावर शेकावी. दुसर्‍या बाजूला लावलेले पाणी सुकले कि फुलके भाजायच्या चिमट्याने दुसरी बाजू थेट आचेवर ठेवावी. चिमट्याच्या मदतीने थोडी गोलगोल फिरवावी म्हणजे जळणार नाही.
३) भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि ज्वारी/बाजरीची भाकरी खातात. भाकरीवर तिळ लावून भाकरी भाजतात. भाकरी लाटताना/ थापताना वरून तिळ पेरावे आणि मग लाटावी/ थापावी.

भोगीची भाजी - Bhogi Bhaji

Bhogichi Bhaji in English

वेळ: पूर्वतयारी २० मिनीटे । पाकृसाठी: १५ ते २० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

bhogichi Bhaji, sankrant tilachya recipes, tilachya recipes, tilgul, tigulache ladu, tilache ladu, mix bhaji, makar sankrant, tilachya vadya, tilgulachya vadyaसाहित्य:
१ मोठा बटाटा, सोलून मध्यम फोडी (साधारण १ ते दिड कप)
१ मध्यम वांगे किंवा ३ ते ४ भरायची लहान वांगी (साधारण १ ते सव्वा कप मध्यम फोडी)
१ कप गाजराचे मध्यम तुकडे
१/२ कप ओले चणे (मी फ्रोजन वापरले होते)
१/४ कप भिजवलेले शेंगदाणे (२-३ तास भिजवणे)
१/४ कप पावट्याचे दाणे (ऐच्छिक)
६ तुकडे शेवगा शेंगेचे (३ इंचाचे तुकडे) (टीप)
फोडणीसाठी - २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट,१/४ टिस्पून जिरे
३-४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून भाजलेल्या तिळाचा कूट
२ टिस्पून काळा मसाला - रेसिपीसाठी इथे क्लिक करा
२ टेस्पून चिंचेचा दाट कोळ
१ ते दिड टेस्पून किसलेला गूळ
१/४ कप ओलं खोबरं
चवीपुरते मिठ

कृती:
१) पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. प्रथम बटाटा, ओले चणे, पावटे, शेवग्याच्या शेंगा आणि शेंगदाणे घालून २ वाफा काढाव्यात.
२) नंतर वांगं आणि गाजर घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे.
३) भाज्या शिजत आल्या कि चिंच कोळ आणि काळा मसाला घालावा तसेच लागल्यास थोडे पाणी घालावे.
४) भाज्या शिजल्या कि गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे. लागल्यास चव पाहून मिठ घालावे. एक उकळी काढून भाकरीबरोबर गरमागरम भाजी सर्व्ह करावी.

टीप:
१) शेवग्याच्या शेंगा कोवळ्या घ्याव्यात नाहीतर त्या आतपर्यंत शिजत नाहीत. जर शेंगा जुन असतील तर त्या थोड्या वाफवून घ्याव्या.
२) भाजी शिजायला थोडा वेळ लागतो. जर झटपट भाजी हवी असेल तर चणे, पावटे, शेंगा, शेंगदाणे कूकरमध्ये २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावे. परंतु भाज्या बाहेर शिजवल्यावर जो स्वाद येतो, तो कूकरमध्ये भाज्या शिजवल्यास येत नाही.

गुळपोळी - gulpoli

Gulpoli in English

वेळ: साधारण २ तास
नग: जवळपास २५ मध्यम गुळपोळ्या

साहित्य:
सारणासाठी
१/२ किलो गूळ
१ कप बेसन
२ सुक्या नारळाच्या वाट्या
३/४ कप तिळ
१/२ कप शेंगदाणे
१/२ कप खसखस
१/२ कप तेल
आवरणासाठी
दिड कप मैदा
३/४ कप कणिक
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ
२ टेस्पून बेसन (ऐच्छिक)

कृती:
१) सुक्या नारळाच्या वाट्या किसून घ्याव्यात. सोनेरी रंग येईस्तोवर कोरडेच भाजावे. हाताने चुरून घ्यावे. हा चुरा आपल्याला १/२ ते ३/४ कप हवा आहे. कमी असल्यास अजून थोडं खोबरं भाजून चुरा करावा.
२) तिळ व खसखस स्वतंत्र, कोरडेच भाजून घ्यावे. बारीक पूड करून घ्यावी
३) शेंगदाणे भाजून त्याची साले काढून टाकावीत आणि एकदम बारीक कूट करून घ्यावा.
४) एका मध्यम पण जाड बुडाच्या पातेल्यात १/२ कप तेल गरम करावे. त्यात १ कप बेसन खमंग भाजून घ्यावे.
५) गूळ बारीक किसणीवर किसून घ्यावा. सर्व भाजलेले जिन्नस (तिळ, खसखस, शेंगदाणे, बेसन, सुकं खोबरं) गूळामध्ये घालून मळून घ्यावे आणि घट्ट गोळा करावा.
६) मैदा, कणिक, मिठ आणि बेसन (ऐच्छिक) एकत्र करावे. २ टेस्पून तेल कडकडीत गरम करून पिठात घालावे. पाणी घालून मध्यमसर घट्ट गोळा भिजवावा. लागल्यास थोडे साधं तेल घालावे. १५ मिनीटे झाकून ठेवणे.
७) सारणाचे २३ ते २५ सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे.
८) आवरणासाठी आपल्याला "१ सारण गोळ्याला २ पिठाचे गोळे" हवे आहेत त्यानुसार सारणाच्या गोळ्यापेक्षा जरा लहान असा पिठाचा गोळा करावा.
९) २ पिठाच्या लाटयांमध्ये १ सारणाचा गोळा भरून लाटीच्या कडा सिल करून बंद करावा. हाताने हलके प्रेस करून थोड्या कोरड्या पिठावर पोळी लाटावी. गुळाची पोळी एका बाजूनेच लाटावी, बाजू पलटू नये.
१०) मिडीयम हाय हिटवर तवा तापवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्याव्यात. कागदावर काढून किंचीत गार होवू द्याव्यात. एकदम गरम खावू नये, सारणातील गूळ गरम असल्याने चटका बसू शकतो.
गुळपोळी गार किंवा कोमट दोन्हीप्रकारे छान लागते. गुळपोळीवर नेहमी थोडे तूप घालून खावे म्हणजे उष्ण पडत नाही.

टीप्स:
१) पिठांचे प्रमाण आवडीनुसार बदलू शकतो. जर तुम्हाला खुडखुडीत पोळी हवी असेल तर मैदा जास्त आणि कणिककमी वापरावी तसेच गरम तेलाचे मोहनही घालावे. जर थोडी नरम पोळी हवी असेल तर फक्त गव्हाचे पिठ वापरावे आणि थंड तेलाचेच मोहन घालावे.

तिळाच्या वडया - Tilachya Vadya

Tilachya Vadya in English

साधारण २० वड्या

साहित्य:
१/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
१/२ कप किसून भाजलेले सुके खोबरे
१/२ कप तिळ
पाऊण कप किसलेला गूळ
१/२ टेस्पून तूप (साधारण २ टिस्पून)
१/२ टिस्पून वेलचीपूड
सुकामेवा (ऐच्छिक) (काजू बदामचे तुकडे)

कृती:
१) तिळ मध्यम आचेवर कोरडेच भाजून घ्यावेत. आणि मिक्सरमध्ये अगदी काही सेकंद फिरवावे. तिळाची पूड करू नये, तिळ अर्धवट मोडले गेले पाहिजेत.
२) वड्या करण्यापुर्वी दोन स्टीलच्या ताटांना तूपाचा हात लावून ठेवावा. पातेल्यात तूप गरम करावे. त्यात किसलेला गूळ घालावा. गूळ वितळला कि गॅस बंद करावा. लगेच त्यात शेंगदाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, आणि भाजलेले तिळ घालावेत आणि भराभर मिक्स करावे. लगेच वेलचीपूड आणि सुकामेवा घालावा. मिक्स करून हे दाटसर मिश्रण तूप लावलेल्या ताटात घालून थापावे. मिश्रण गरम असल्याने थापण्यासाठी एखाद्या वाटीच्या बुडाला तूप लावून त्याने थापावे.
३) मिश्रण गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

Labels:
Sesame Cakes, Sesame vadi, Tilachya Vadya

तिळगुळाचे लाडू - Tilgul

Tilgulache Ladu (English version)

तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगूळ घ्या गोड गोड बोला !!

tilache ladu recipe, tilgul recipe, tilgul, sankrant ladu, ladu recipe, tilache ladu, tilgul ladu, diet recipe, hearth healthy recipe, loose weight recipe, weight loss recipe, healthy recipe, low carb reciep
साहित्य:
१/२ किलो तिळ
१/२ किलो चिकीचा गूळ
१ ते दिड वाटी शेंगदाण्याचा भरडसर कूट
१ वाटी किसून भाजलेले सुके खोबरे
१/२ वाटी चण्याचं डाळं
१ चमचा वेलची पूड
१ ते २ चमचे तूप

कृती:
१) १/२ किलो तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. पातेल्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा गोळीबंद पाक करावा. सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो.
पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला कि गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
२) पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याचे डाळं, वेलची पूड घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच लाडू वळावेत. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.

टीप:
१) लाडूंमध्ये आवडत असल्यास काजूतुकडा किंवा ईतर सुकामेवा घालू शकतो.

Labels:
Sesame Laddu, Tilache Ladu, Makarsankranti Ladu, Tilgulache Ladu Recipe