Pages

Showing posts with label Patal Bhaji. Show all posts
Showing posts with label Patal Bhaji. Show all posts

भोगीची भाजी - Bhogi Bhaji

Bhogichi Bhaji in English

वेळ: पूर्वतयारी २० मिनीटे । पाकृसाठी: १५ ते २० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

bhogichi Bhaji, sankrant tilachya recipes, tilachya recipes, tilgul, tigulache ladu, tilache ladu, mix bhaji, makar sankrant, tilachya vadya, tilgulachya vadyaसाहित्य:
१ मोठा बटाटा, सोलून मध्यम फोडी (साधारण १ ते दिड कप)
१ मध्यम वांगे किंवा ३ ते ४ भरायची लहान वांगी (साधारण १ ते सव्वा कप मध्यम फोडी)
१ कप गाजराचे मध्यम तुकडे
१/२ कप ओले चणे (मी फ्रोजन वापरले होते)
१/४ कप भिजवलेले शेंगदाणे (२-३ तास भिजवणे)
१/४ कप पावट्याचे दाणे (ऐच्छिक)
६ तुकडे शेवगा शेंगेचे (३ इंचाचे तुकडे) (टीप)
फोडणीसाठी - २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट,१/४ टिस्पून जिरे
३-४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून भाजलेल्या तिळाचा कूट
२ टिस्पून काळा मसाला - रेसिपीसाठी इथे क्लिक करा
२ टेस्पून चिंचेचा दाट कोळ
१ ते दिड टेस्पून किसलेला गूळ
१/४ कप ओलं खोबरं
चवीपुरते मिठ

कृती:
१) पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. प्रथम बटाटा, ओले चणे, पावटे, शेवग्याच्या शेंगा आणि शेंगदाणे घालून २ वाफा काढाव्यात.
२) नंतर वांगं आणि गाजर घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे.
३) भाज्या शिजत आल्या कि चिंच कोळ आणि काळा मसाला घालावा तसेच लागल्यास थोडे पाणी घालावे.
४) भाज्या शिजल्या कि गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे. लागल्यास चव पाहून मिठ घालावे. एक उकळी काढून भाकरीबरोबर गरमागरम भाजी सर्व्ह करावी.

टीप:
१) शेवग्याच्या शेंगा कोवळ्या घ्याव्यात नाहीतर त्या आतपर्यंत शिजत नाहीत. जर शेंगा जुन असतील तर त्या थोड्या वाफवून घ्याव्या.
२) भाजी शिजायला थोडा वेळ लागतो. जर झटपट भाजी हवी असेल तर चणे, पावटे, शेंगा, शेंगदाणे कूकरमध्ये २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावे. परंतु भाज्या बाहेर शिजवल्यावर जो स्वाद येतो, तो कूकरमध्ये भाज्या शिजवल्यास येत नाही.

सिमला मिरची रस भाजी - Simla Mirchi batata Ras Bhaji

Simla Mirchi Rassa in English

वेळ: ३० मिनीटे
वाढणी: ३ जणांसाठी

bhopli mirchi, dhobli mirchi recipe, capsicum sabzi, bell pepper bhaji, Indian vegetables, capsicum curry, bhopli mirchi chi bhaji

साहित्य:
२ कप भोपळी मिरचीचे मोठे तुकडे
१ कप बटाट्याचे मध्यम तुकडे
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून गोडा मसाला
२ टेस्पून शेंगदाणा कूट
१ टेस्पून ताजा नारळ
१ टेस्पून चिंचेचा कोळ
१ टेस्पून गूळ किंवा चवीनुसार
चवीपुरते मिठ

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. आधी बटाटे घालून मिक्स करावे. साधारण एक ते दोन मिनीट वाफ काढावी.
२) आता भोपळी मिरची घालून मिक्स करावे. अंदाजे ३/४ कप पाणी, गोडा मसाला, चिंचेचा कोळ आणि मिठ घालून मिक्स करावे. बटाटे शिजेस्तोवर शिजवावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे. भोपळी मिरची एकदम मऊ होईस्तोवर शिजवू नये. अगदी किंचीत कच्ची राहू द्यावी.
३) बटाटा शिजला कि भाजीत गूळ, नारळ आणि शेंगदाणा कूट घालावा. छान ढवळावे आणि गरम गरम पोळीबरोबर सर्व्ह करावे.

तोंडली डाळ मेथ्या - Tondli Ras bhaji

Tondli Dal Methya in English

वेळ: पूर्वतयारी-१० मिनीटे। पाकृसाठी-१५ मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

tondli dalimbya, tondali bhaji, tondalyachi bhaji, Indian vegetable, Indian curry recipeसाहित्य:
१/२ पौंड तोंडली (जवळपास पाव किलो)
१/४ कप तूर डाळ
१/२ टिस्पून मेथी दाणे
३ ते ४ लसणीच्या मोठ्या पाकळ्या, बारीक चिरून
फोडणीसाठी: १ टिस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून गोडा मसाला
१ टिस्पून गूळ
१/२ टिस्पून चिंचेचा घट्ट कोळ किंवा २ कोकमाचे तुकडे
चवीनुसार मिठ
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) तोंडली उभी चिरून मिठाच्या पाण्यात घालावी.
२) तूरडाळ धुवून १० मिनीटे पाण्यात भिजवून ठेवावी.
३) लहान कूकरमध्ये तेल गरम करावे. त्यात लसूण आणि मेथी दाणे फोडणीस घालावे. लसूण थोडी ब्राऊन होवू द्यावी. नंतर मोहोरी, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. तोंडल्यातील पाणी निथळून फोडणीस घालावी. एकदा परतून तूरडाळ घालावी व मिक्स करावे.
४) यामध्ये गूळ, गोडा मसाला, मिठ, आणि कोकम घालावे. थोडे पाणीसुद्धा घालावे (साधारण १/२ कप). मिक्स करून कूकरचे झाकण बंद करावे.
५) ३ शिट्ट्या करून गॅस बंद करावा. वाफ जिरू द्यावी. कूकर उघडून रश्श्याची चव पाहावी आणि तिखट-मिठ-मसाला लागेल तसे अडजस्ट करावे.
कोथिंबीरीने सजवून गरमच पोळीबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) पदार्थ शिजायला काही कूकरला जास्त शिट्ट्या लागतात तर काहींना कमी. ३ शिट्ट्यांमध्ये तोंडली शिजतीलच. आपल्याला डाळ शिजलेली हवी पण ती आख्खी राहिली पाहिजे, तीचे वरण होता कामा नये. म्हणून आपापल्या कूकरप्रमाणे किती शिट्ट्या कराव्या ते ठरवावे.

ऋषींची भाजी - Rishi Panchami Bhaji

Rishi Panchami Bhaji in English

४ जणांसाठी (प्रत्येकी १ मोठी वाटी)
वेळ: २० मिनीटे

Ganapati Recipes, Rishi Panchami Bhaji, Rishi chi Bhajiसाहित्य:
पाऊण ते एक कप भेंडीचे तुकडे (१ इंच)
४ अळूची मध्यम पाने (टीप)
१/२ कप पडवळाच्या चकत्या
२०० ग्राम लाल भोपळ्याच्या फोडी (मध्यम) (साले काढून)
१/४ कप मटारचे दाणे
१/४ कप पापडी दाणे
१/४ कप मक्याचे दाणे
५-६ बेबी कॉर्न, (१ इंचाचे तुकडे करावे)
२ टेस्पून शेंगदाणे (३ तास भिजवलेले)
२ टिस्पून चिंच (कोळ करून घ्यावा)
१ हिरवी मिरची
१/२ कप ताजा खवलेला नारळ
१ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
चवीपुरते मिठ

कृती:
१) अळूची पाने धुवून त्याची देठं कापून घ्यावीत. देठ सोलून वेगळी ठेवावीत. त्याचे बारीक तुकडे करावेत.
२) पाने बारीक चिरून घ्यावीत. कूकरमध्ये अळू (फक्त पाने) १ शिट्टी करून शिजवून घ्यावा.
२) अळूची शिजवलेली पाने मिक्सरमध्ये वाटून घ्यावीत. वाटताना मिरचीही घालावी.
३) कूकर गरम करावा व त्यात तूप-जिर्‍याची फोडणी करावी. त्यामध्ये सर्व भाज्या अळूच्या देठांसह फोडणीस घालाव्यात. थोडावेळ परतून वाटलेली अळूची पाने घालावीत.
४) चिंचेचा कोळ घालावा. चवीपुरते मिठ आणि भाज्या शिजण्यापुरते पाणी घालावे.
५) कूकरचे झाकण बंद करावे आणि मध्यम आचेवर साधारण १५ मिनीटे भाजी शिजू द्यावी. १५ मिनीटांनी गस बंद करावा. वाफ मुरली कि कूकरचे झाकण उघडावे आणि ओला नारळ घालून मिक्स करावे. एक उकळी काढावी.
गरमा गरम भाजी, पोळी किंवा दशमीबरोबर सर्व्ह करावी. हि भाजी नुसती खायलाही चविष्ट लागते.

टीप:
१) मला जितक्या भाज्या मिळाल्या तेवढ्या मी वापरल्या. परंतु ऋषींच्या भाजीमध्ये अजूनही काही भाज्या वापरल्या जातात. यामध्ये मुख्यत: लाल माठ, चवळी, आंबट चुका, अंबाडी यासारख्या पालेभाज्या वापराव्यात. पालक, मेथी, शेपू यांसारख्या उग्र चवीच्या भाज्या वापरू नयेत, भाजीची चव बिघडते. तसेच सुरण, रताळे, अळकुडी (अर्बी) यांसारखे कंदही वापरावेत. काकडी, तोंडली आणि दोडकाही घालता येतो.
२) जर अंबाडीचा पाला वापरणार असाल तर चिंचेचा कोळ घालू नकात अथवा चव पाहून अगदी कमी प्रमाणात घालावा.
३) मी अळूची पाने उकडून, बारीक वाटून घेतली होती. याचे कारण भाजी चांगली मिळून येते. पालेभाज्या नुसत्या बारीक चिरून इतर भाज्यांबरोबर फोडणीस घातल्या तरीही चालेल.
४) आंबट चवीच्या भाज्या आणि चिंच वापरायची नसेल तर भाजी तयार झाल्यावर उकळी काढताना, आंबटपणासाठी १ वाटी घट्ट ताक घालावे आणि थोडावेळ ढवळावे म्हणजे ताक फुटणार नाही.
५) भाजीला तूप-जिर्‍याची फोडणी घातली नाही तरीही चालते. कूकरमध्ये सर्व भाज्या फोडणीशिवाय शिजवाव्यात (वरील कृतीप्रमाणे). आणि भाजी सर्व्ह करताना १ टिस्पून तूप घालून सर्व्ह करावी.
६) भाज्यांचे प्रमाण आवडीनुसार कमीजास्त केले तरीही चालते.

Labels:
Rishi Panchami Bhaji, Rishi chi Bhaji, Ganapati Recipes

व्हेजिटेबल कोर्मा - Vegetable Korma

Vegetable Korma in English

वेळ: ३० मिनीटे
वाढणी: ४ जणांसाठी

paneer korma, korma curry recipe, vegetable korma, shahi korma, korma recipe, Indian curry recipesसाहित्य:
दोन कप कॉलीफ्लॉवरचे मध्यम तुरे
१/२ कप मटार
२ मध्यम गाजरं, लहान चौकोनी तुकडे
१/२ कप फरसबीचे तुकडे (२ इंच तुकडे)
१/२ कप पनीरचे चौकोनी तुकडे (ऐच्छिक)
१/२ कप कांदा, बारीक चिरून
१/२ कप टोमॅटो, बारीक चिरून
५ ते ६ काजू
१ टिस्पून गरम मसाला
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, ३-४ लवंगा, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून लसूण पेस्ट
१ टिस्पून आले पेस्ट
१ टिस्पून धणेपूड
१/२ कप नारळाचे दूध
१/२ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ

कृती:
१) कॉलीफ्लॉवरचे तुकडे, मटार, गाजराचे तुकडे, फरसबीचे तुकडे मायक्रोवेव सेफ भांड्यात घ्यावेत. भाज्या बुडतील एवढे पाणी घालावे. १ टिस्पून मिठ घालून मिक्स करावे. मायक्रोवेवमध्ये भाज्या अर्धवट शिजवून घ्याव्यात. (मी भाज्या ५ मिनीटे हाय पॉवरवर शिजवल्या होत्या)
२) कढईत तेल गरम करावे. त्यात लवंग आणि काजू घालून काही सेकंद परतावे. नंतर मोहोरी, जिरे, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. लसूण पेस्ट परतावी.
३) लसूण पेस्ट परतल्यावर कांदा घालून खमंग परतावा. नंतर टोमॅटो घालावा आणि टोमॅटो एकदम मऊ होईपर्यंत परतावे.
४) नंतर अर्धवट शिजवलेल्या भाज्या घालाव्यात तसेच थोडे (साधारण १/२ कप) पाणी घालावे. गरम मसाला आणि धणेपूड घालावी. झाकण ठेवून भाज्या शिजू द्याव्यात. नंतर नारळाचे दूध, आलेपेस्ट आणि पनीरचे तुकडे घालावे. मध्यम आचेवर २ मिनीटे उकळी काढावी. चवीपुरते मिठ आणि साखर घालावी.
गरमागरम कोर्मा पोळी, पुरी किंवा रोटी बरोबर सर्व्ह करावा.

टीप्स:
१) कोर्मा जर थोडा रस्सेदार केला तर भाताबरोबरही छान लागतो.
२) जर मायक्रोवेव नसेल तर पातेल्यात पाणी उकळवावे. त्यामध्ये भाज्या घालून १ मिनीटभर उकळी काढावी. गॅस बंद करावा आणि पातेल्यावर झाकण ठेवून वाफेवर भाज्या अर्धवटच शिजवाव्यात.
३) कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरावा.
४) पनीर जर फ्रोजन असेल तर तुकडे करून थोडावेळ गरम पाण्यात घालून ठेवावे. नरम झाले कि पाण्याबाहेर काढावे.
५) आवडीनुसार अजून दुसर्‍या भाज्याही यामध्ये घालू शकतो (उदा. बटाटा)
६) भाज्यांचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करावे.

Labels:
Vegetable Korma, Korma curry recipe, Indian Curry, Mixed vegetable curry

वांगी बटाटा रस्सा - Vangi batata Rassa

Vangi Batata Rassa in English

२ ते ३ जणांसाठी
वेळ: २० ते ३० मिनीटे

vangi batata rassa, vangyacha rassa, rassa recipeसाहित्य:
५-६ लहान जांभळी वांगी (टीप १ आणि ३)
२ मध्यम बटाटे
१ टेस्पून तेल
फोडणीचे साहित्य: १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, २ कढीपत्ता पाने
१ ते दिड टेस्पून दाण्याचा कूट
१ टिस्पून काळा मसाला
१ टेस्पून चिंचेचा कोळ
१ टेस्पून गूळ
चवीपुरते मिठ
१ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) वांग्याची देठं काढून टाकावीत. आणि प्रत्येक वांग्याचे ८ लहान तुकडे करावे. गार पाण्यात घालून ठेवावेत. बटाटे सोलून त्याचे मध्यम चौकोनी तुकडे करावेत आणि दुसर्‍या गार पाण्याच्या वाडग्यात ठेवावे.
२) कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. बटाट्याच्या फोडी पाण्यातून उपसून काढाव्यात आणि फोडणीत घालाव्यात. २ ते ३ मिनीटे व्यवस्थित परतून घ्याव्यात. थोडावेळ वाफ काढावी.
३) त्यात वांग्याच्या फोडी घालाव्यात. त्यात थोडे पाणी घालून मंद आचेवर वाफ काढावी. त्यात मिठ, चिंचेचा कोळ, आणि काळा मसाला घालून बटाटा आणि वांग्याच्या फोडी शिजू द्याव्यात. गरज लागल्यास थोडे पाणी घालावे.
४) बटाटा आणि वांग्याच्या फोडी शिजल्या नंतरच त्यात गूळ घालावा (टीप २). दाण्याचा कूट घालून उकळी काढावी.
गरमागरम रस्सा पोळी किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावा.

टीप:
१) जर लहान वांगी नाही मिळाली तर १ चायनीज वांगे वापरावे किंवा अर्धे मोठे वांगे (भरीताचे) वापरावे.
२) बटाटा आणि वांगे शिजल्यावरच त्यात गूळ घालावा, जर अगोदरच गूळ घातला तर बटाटा आणि वांगे आवठरतात आणि पटकन शिजत नाहीत.
३) कधी कधी मोठी वांगी घशाला खवखवतात, अशावेळी छोटी वांगी बरी पडतात.

मेथी मलई मटर - Methi Malai Mutter

Methi malai Matar in English

२ जणांसाठी
वेळ: ४५ मिनीटे

methi malai matar, methi matar malai, methi malai mutter recipe,north indian spicy curryसाहित्य:
३ कप मेथीची फक्त पाने
१/२ कप मटार
१ हिरवी मिरची
१/२ कप कांद्याची पेस्ट
१ टेस्पून बटर
२ काळ्या मिरी
१ वेलची
१ लहान दालचिनीची काडी
१/२ कप दुध
चवीपुरते मिठ

कृती:
१) कढईत बटर गरम करावे त्यात हिरवी मिरची घालून काही सेकंद परतावे. नंतर मिरी, वेलची आणि दालचिनीची काडी घालून त्यांचा छान वास येईस्तोवर परतावे.
२) या फोडणीत कांद्याची पेस्ट घालावी. मध्यम आचेवर परतावे. कांद्यातील सर्व पाणी निघून जाऊन कांदा शिजला कि त्यात धुवून स्वच्छ केलेली मेथीची पाने घालावीत. मध्यम आचेवर मेथी परतावी. शिजवताना कढईवर झाकण ठेवू नये, मेथीचा रंग बदलतो.
३) पाने थोडी शिजली कि त्यात मटार आणि दूध घालावे आणि मंद आचेवर शिजवावे. चवीनुसार मिठ घालावे. १ ते २ टेस्पून क्रिम घालावे आणि थोडावेळ मंद आचेवर शिजवावे.
हि भाजी छान मिळून यायला वेळ लागतो त्यामुळे शिजवताना घाई करू नये.

टीप:
१) आलेलसूण पेस्ट आवडीनुसार फोडणीत घालू शकतो.परंतु, त्यामुळे मेथीचा स्वाद एकदम कमी होतो आणि भाजी तेवढी फ्लेवरफुल लागत नाही.
२) फ्रेश क्रिममुळे भाजीला थोडी गोडसर चव येते. पण वाटल्यास चिमूटभर साखर घालावी.

Labels:
Methi Malai Matar, methi mutter malai

चिंचगूळातील भेंडी - Chinch gulachi Bhendi

Sweet Sour Okra Curry in English

३ ते ४ जणांसाठी
वेळ: साधारण ३५ मिनीटे

chinch gulachi bhendi, bhendi curry, sweet and sour okra curryसाहित्य:
पाव किलो भेंडी
१ टेस्पून तेल
फोडणीसाठी: १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, ४-५ कढीपत्ता पाने
२ टेस्पून खवलेला नारळ
मोठ्या लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ
१ टेस्पून गूळ
१ टेस्पून शेंगदाणा कूट
२ टिस्पून गोडा मसाला
चवीपुरते मिठ
कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) भेंडी धुवून घ्यावी. स्वच्छ कपड्याने कोरडी करून गोल चकत्या करून घ्याव्यात.
२) चिंच पाण्यात भिजवून त्याचा कोळ करून घ्यावा. कोळात १ भांडे पाणी घालावे.
३) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. ताजा नारळ घालून काही सेकंद परतावा.
४) नंतर चिरलेली भेंडी घालून दोनेक मिनीटे मोठ्या आचेवर परतावे. त्यात चिंचेचे पाणी घालावे. मिठ घालावे आणि मध्यम आचेवर झाकण ठेवून भेंडी शिजेस्तोवर वाफ काढावी. गरज वाटल्यास पाणी वाढवावे.
५) भेंडी शिजत आली कि त्यात गूळ, गोडा मसाला, आणि शेंगदाण्याचा कूट घालून एक दोन वेळा उकळी काढावी.
कोथिंबीर घालून चिंचगूळाची भेंडी गरमागरम तूप भाताबरोबर वाढावी.

Labels:
Okra curry, Chinch gulachi bhendi

फ्लॉवर बटाटा रस्सा - Batata Rassa

Potato Curry in English

वेळ: ४० मिनीटं
३ ते ४ जणांसाठी

potato rassa, potato curry, Spicy curry, Maharashtrian potato curry, vegetarian curryसाहित्य:
३ मोठे बटाटे, (सोलून मध्यम तुकडे करून पाण्यात ठेवून द्यावे)
फ्लॉवरचे ८ ते १० मध्यम तुरे (फ्रोझन)
१ मोठा कांदा, बारीक चिरून
१/२ कप किसलेले सुके खोबरे, भाजून
४ ते ५ लसूण पाकळ्या, तुकडे करून
१ टिस्पून तेल
१ टोमॅटो (प्युरी करून)
२ टिस्पून कांदा लसूण मसाला
४ कप पाणी
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, २-३ कढीपत्ता पाने
कोथिंबीर सजावटीसाठी
चवीपुरते मिठ

कृती:
१) कढईत १ टिस्पून तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा घालून, कांदा खरपूस होईस्तोवर परतावे. लगेच भाजलेले खोबरे घालून दोन मिनीटं परतावे. परतलेले मिश्रण गार झाले कि १/४ कप पाणी घालून मिक्सरमध्ये पातळ पेस्ट बनवून घ्यावी.
२) त्याच कढईत १ टेस्पून तेल गरम करावे त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता पाने घालून फोडणी करावी. बटाटे पाण्यातून उपसून लगेच फोडणीस घालावेत. मध्यम आचेवर ३ ते ४ वाफा येऊ द्याव्यात. आधीच पाणी घालू नये, थोडा पाण्याचा हबका मारावा तसेच मधे मधे चमच्याने परतावे म्हणजे बटाटा चिकटणार नाही.
३) बटाटयाचा थोडा शिजल्यासारखा वाटला कि लगेच फ्लॉवरचे तुकडे घालावेत. कांद्याची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी घालावी ३ ते ४ कप पाणी घालावे. कांदा लसूण मसाला, मिठ घालून मध्यम आचेवर कढईवर झाकण ठेवून बटाटा आणि फ्लॉवर शिजू द्यावा. साधारण २५ ते ३० मिनीटे लागतील शिजायला. भाजी शिजत असताना मधेमधे ढवळावे. रश्श्याची चव पाहून गरजेनुसार कांदा-लसूण मसाला, मिठ, किंवा लाल तिखट घालावे.
कोथिंबीरीने सजवून भात, पोळी किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावी.

Labels:
Potato Rassa, Potato spicy curry

पालकाची आमटी - Spinach Curry

Spinach Curry in English

वाढणी: ३ जणांसाठी

Spinach Amti, Palak curry, Spinach curry, Spicy spinach curryसाहित्य:
२ कप पालक, बारीक चिरलेला
१ टेस्पून तेल
१/२ टिस्पून जिरे, १/२ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून शेंगदाणे
१ टेस्पून चणाडाळ
१ टिस्पून सुक्या नारळाचे पातळ काप
२ टिस्पून चिंचेचा घट्ट कोळ
१ टिस्पून गूळ
२ टिस्पून तूप
३ ते ४ कढीपत्ता पाने
१ टेस्पून काजू
२ ते ३ लसणीच्या पाकळ्या, सोलून किंचीत ठेचलेल्या
चवीपुरते मिठ
कोथिंबीर आणि ताजा खोवलेला नारळ सजावटीसाठी

कृती:
१) चणा डाळ आणि शेंगदाणे एकत्र कोमट पाण्यात साधारण ४ तास भिजवून ठेवा.
२) कढईत १ टेस्पून तेल गरम करा. त्यात जिरे, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून काही सेकंद परता. नंतर त्यात भिजवलेले शेंगदाणे आणि चणाडाळ घाला. एक मिनीटभर परता. चिरलेला पालक आणि साधारण १/२ टिस्पून मिठ घालून २ ते ३ मिनीटे परता. कढई न झाकता पालक चांगला शिजू द्यात.
३) त्यात १ ते दिड कप पाणी घाला आणि १ उकळी येऊ द्यात. चिंच, गूळ, शेंगदाणे कूट आणि गरम मसाला घाला. चव पाहून गरज वाटल्यास मिठ घाला. मध्यम आचेवर २ मिनीटे उकळू द्यात. तयार आमटी सर्व्हींग बोलमध्ये काढा.
४) छोट्या कढल्यात तूप गरम करा. त्यात कढीपत्ता आणि लसूण पाकळ्या घाला. लसूण जराशी सोनेरी होवू द्यात. लगेच काजू घाला आणि थोडा सोनेरी रंग चढेस्तोवर चमच्याने ढवळा. आता सुका खोबरं घालून ५ ते १० सेकंद परता आणि हि फोडणी तयार आमटीवर ओता.
हि आमटी गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करा. तसेच हि आमटी भाकरीबरोबरही छान लागते.

टीप:
१) पालक एकदम बारीक चिरा, पालकाचे मोठे मोठे तुकडे चांगले लागत नाहीत.
२) या आमटीत शिजवलेली डाळ घातलेली नाहीये. म्हणून थोडी पातळ कटासारखी होते, यासाठी गरजेनुसार पाणी घालावे.

Labels:
Palak dal, Palak amti, palakachi amti, Spinach curry

राजमा मसाला - Rajma Masala

Rajma Masala bhaji in English

Rajma, Rajma curry, Rajma rice, Rajma Masala, spicy rajma curryसाहित्य:
३/४ ते १ कप राजमा (रेड बिन्स)
१ टिस्पून ते दिड टिस्पून आलेलसूण पेस्ट
३/४ कप कांदा, बारीक चिरून
३ मध्यम टोमॅटो
१ ते २ टेस्पून तेल
१ तमालपत्र
१ इंच दालचिनी तुकडा
१/२ टिस्पून जिरे
१/४ टिस्पून हळद
१ टिस्पून लाल तिखट (शक्य असल्यास काश्मिरी)
१ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून धणेपूड
१/४ टिस्पून आमचुर पावडर
१/२ टिस्पून गरम मसाला
चवीपुरते मिठ

Indian exotic spices, target, Indian curry recipe, curry recipes, how to make rajma masala
कृती:
१) राजमा पाण्यात ६ ते ७ तास भिजत ठेवावा. प्रेशरकूक करून मऊसर शिजवून घ्यावा. खुप जास्त शिजवू नये नाहीतर दाणे फुटून करी चांगली लागणार नाही. शिजवताना मिठ घालावे
२) टोमॅटो धुवून उकळत्या पाण्यात १ मिनीट घालून लगेच गार पाण्यात घालावेत म्हणजे टोमॅटोची साले सुटायला मदत होते. टोमॅटो सोलून घ्यावेत, आतील बिया नको असल्यास काढून टाकाव्यात. उरलेला गर मिक्सरमध्ये घालून त्याची प्युरी करावी.
३) पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तमालपत्र आणि दालचिनी घालून ३० सेकंद परतावे. जिरे, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. लगेच आले-लसूण पेस्ट घालावी आणि परतावे.
४) नंतर कांदा घालून चांगला खरपूस परतावा. जर कांदा निट परतला नाही तर भाजीत आख्खे तुकडे दिसतात. तसेच कांदा परतताना मिठ घालू नये आणि झाकणही ठेवू नये. तेलावरच तो भाजला गेला पाहिजे. वाफेवर शिजवून आणि परतून या दोन्ही कृतींमुळे चवीत फरक पडतो.
५) कांदा परतला कि त्यात टोमॅटोची प्युरी करावी. मध्यम आचेवर झाकून शिजू द्यावे. गरजेपुरते पाणी घालावे. ३ ते ४ मिनीटांनी त्यात धणे-जिरेपूड, आमचूर पावडर आणि गरम मसाला घालावा. मिक्स करून एक दोन मिनीटे उकळी काढावी.
६) नंतर शिजवलेले राजमा बिन्स घालून ढवळावे, गरज वाटल्यास मिठ घालावे. मंद आचेवर राजमा २० मिनीटे शिजू द्यावा. ग्रेव्हीसाठी पाण्याचे प्रमाण कमीजास्त करावे.
गरम गरम भाताबरोबर राजमा करी खुपच चवदार लागते.

Labels:
Rajama masala, Rajma Recipe, Red beans curry, Rajama bhaji

चण्याची उसळ आणि पाव - Chickpeas Spicy Curry

Usal pav Recipe in English

वाढणी: २ ते ३ जणांसाठी

chana masala, kabuli channa, Kabuli Chana recipe, Chole, channa masala, Chana Curry Chickpeas curry, spicy Indian Curry

साहित्य:
३/४ कप काबुली चणे (छोले)
२ टेस्पून तेल
१ कप टोमॅटो, बारीक चिरून
३/४ ते १ कप कांदा, बारीक चिरून
१/२ टिस्पून जिरे
१ टिस्पून लाल तिखट
२ हिरव्या मिरच्या
४-५ कढीपत्ता पाने
१ टिस्पून आलेपेस्ट
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून दालचिनी पूड
१/२ टिस्पून गरम मसाला
२ टेस्पून चिंचेचा कोळ
१/८ टिस्पून मिरपूड
चवीपुरते मिठ

कृती:
१) चणे ८ ते १० तास पाण्यात भिजत घालावेत. नंतर कूकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावेत. खुप जास्त शिजवू नये नाहीतर चणे फुटतात. चणे शिजवताना मिठ घालावे.
२) कढईत तेल गरम करावे. त्यात जिरे, लाल तिखट, मिरच्या आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. नंतर आलेपेस्ट घालावी. काही सेकंद फ्राय करून चिरलेला कांदा फोडणीस घालावा, किंचीत मिठ घालावे. मध्यम आचेवर कांदा शिजू द्यावा. कांदा शिजला कि त्यात धणेजिरेपूड, दालचिनी पूड घालून साधारण २० सेकंद ढवळावे. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो घालून मध्यम आचेवर शिजू द्यावे.
३) टोमॅटो निट शिजला कि त्यात शिजवलेले चणे घालावेत. साधारण १ कप पाणी घालावे. ढवळून मध्यम आचेवर एक वाफ काढावी. नंतर त्यात चिंचेचा कोळ, मिरपूड, आणि गरम मसाला घालून थोडावेळ उकळू द्यावे. चणे शिजवताना आणि कांदा शिजवताना आपण मिठ घातले होते त्या अंदाजानुसार रश्श्याची चव पाहून मिठ घालावे.
सर्व्ह करताना वरून कोथिंबीर, चिरलेला कांदा पेरावा. स्लाईस ब्रेडबरोबर किंवा लादी पावाबरोबर गरम गरम सर्व्ह करावे.

Labels:
Chana Masala, Chanyacha Rassa, Usal Pav

पालकाची पातळ भाजी - Palakachi Patal bhaji

Palakachi Patal Bhaaji (English Version)

मला अळूची भाजी प्रचंड आवडते. पण या अमेरीकेतील Indian Stores मध्ये कोमेजून गेलेला अळू बघून तो घ्यावासाच नाही वाटत !! यावर माझ्या सासुबाईंनी एक मस्त आयडीया सांगितली. अळूच्याच भाजीची चव असलेली पालकाची सुद्धा भाजी करता येते !!
हि पालकाची भाजी चवीला अगदी अळूच्या भाजीसारखी लागते (अळूचे फदफदे). ज्यांना अळूची भाजी आवडते आणि अळू जर सहज उपलब्ध नसेल तर हि भाजी नक्की करून पाहा.
spinach recipe, high iron recipe, spinach tasty recipe, spinach curry recipe, spinach variety food, spinach subzi, maharashtrian spinach recipe, palak bhaaji, palak bhaji
साहित्य:
१ जुडी पालक
१ मूठ शेंगदाणे
१ मूठ चणाडाळ
२-३ चमचे तुकडा काजू (ऑप्शनल)
फोडणीसाठी : ४ चमचे तेल, मोहोरी, हिंग, हळद, २-३ हिरव्या मिरच्या
१/२ लहान चमचा मेथी दाणे (ऑप्शनल)
१ चमचा भरून चणापिठ
१ चमचा काळा मसाला
३-४ चमचे चिंचेचा कोळ
१ ते दिड चमचा किसलेला गूळ
मिठ

कृती:
१) शेंगदाणे आणि चणाडाळ ७-८ तास पाण्यात भिजत ठेवावेत. चणाडाळ आणि शेंगदाणे भिजले कि कूकरमध्ये २-३ शिट्ट्या करून शिजवून घ्यावे. शिजवताना किंचीत मिठ घालावे.
२) पालकाची पानं खुडून ती पाण्यात स्वच्छ करून घ्यावीत. थोडावेळ मोठ्या भोकाच्या चाळणीत पाघळत ठेवावी. नंतर पाने बारीक चिरून घ्यावीत.
३) पातेल्यात तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, मिरच्यांचे बारीक तुकडे, मेथीदाणे घालून फोडणी करावी. मध्यम आचेवर त्यात चिरलेला पालक घालावा. पालकाला पाणी सुटले कि त्यात चणापिठ घालावे. आणि चणापिठाबरोबर पालक चांगला घोटावा. चणापिठाच्या गुठळ्या होवू देवू नयेत. २-३ मिनीटे परतावे. चणापिठ घातल्याने पालक चांगल्याप्रकारे घोटला जातो.
४) पालक चांगला घोटला गेला कि त्यात शिजवलेले शेंगदाणे आणि चणाडाळ घालावी, आवडत असल्यास काजूचे तुकडे घालावे. काळामसाला घालावा. थोडे पाणी, चिंचेचा कोळ, मिठ, आणि गूळ घालावा. १ -२ वेळा उकळी काढावी.
हि भाजी जरा घट्टसरच असते अळूच्या भाजीसारखी त्यामुळे आवश्यक तेवढेच पाणी घालावे.

टीप:
१) या भाजीत आवडत असल्यास लसूण फोडणीत घालू शकतो.

Labels:
Spinach Curry, Indian spinach curry, Spicy spinach curry, spinach soup, healthy recipe

मूगाची आमटी - Moog Amati

Moog amati (English Version)

moong amati, healthy soup recipe, moong soup reicpe, moong salad recipe, diet food, maharashtrian food, indian food, amati recipe, vegetarian recipe, oilfree recipe
साहित्य:
१ वाटी हिरवे मूग
२ चमचे खवलेला नारळ
फोडणीसाठी : २ चमचे तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमुटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, ३-४ कढीपत्ता पाने
२ पाकळ्या लसूण
१ लहान कांदा (ऑप्शनल)
१ लहान टोमॅटो
सुपारीएवढी चिंच
१ टिस्पून गूळ
२ टिस्पून गोडा मसाला
मीठ
कोथिंबीर

कृती:
१) मूग १०-१२ तास भिजत घालावे. पाण्यातून उपसून जाड सुती कापडात ८-१० तास गच्च बांधून मोड येऊ द्यावेत.
२) मोड आले कि त्यातील कडक राहिलेले मूग काढून टाकावे. मूग २ शिट्ट्या करून कूकरमध्ये शिजवून घ्यावे.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता,ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालून फोडणी करावी. नारळ परतावा. जर कांदा वापरणार असाल तर कांदा उभा बारीक करून घालावा. कांदा परतला कि त्यात टोमॅटोच्या फोडी घालाव्यात.
४) टोमॅटो १-२ मिनीटे परतून त्यात मूग घालावे. मूग १-२ मिनीटे परतून त्यात २ भांडी पाणी, चिंच घालावी.
५) एक उकळी काढून गूळ आणि गोडा मसाला घालावा. मीठ घालावे. थोडा वेळ मध्यम आचेवर उकळू द्यावे. चिरलेली कोथिंबीर घालावी. गरम गरम तूप भाताबरोबर हि आमटी झकास लागते.

Labels:
Moong Amati, Maharashtrian Amati, moong recipe, Green Gram Recipe, Moogachi Amati

ताकातली पालक भाजी - Takatli Palak Bhaji

Spinach Buttermilk Curry In English

वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: २० मिनीटे

palak bhaji, takatla palak, palak recipe, palak, maharashtrian palak recipe,palak bhaji recipe, dahi palak, spinach recipe, healthy spinach recipe, low calorie spinach recipeसाहित्य :
पालक १ जुडी (बारीक चिरलेला)
२ कप आंबट घट्ट ताक (दही घुसळून अगदी थोडे पाणी घालावे)
पाव ते अर्धा कप शिजवलेले शेंगदाणे
फोडणीसाठी: १ टिस्पून तूप, १/४ टिस्पून मोहरी, १/४ टिस्पून जीरे, १/४ टिस्पून हळद,
३-४ कढीपत्ता पाने
३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
१ टिस्पून आलेपेस्ट
चवीपुरते मिठ

कृती :
१) कढई मध्ये फोडणीसाठी तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की जीरे घालावे.
२) १/२ चमचा हळद घालावी. त्यात मिरची + आले घालावे, सर्व नीट परतल्यावर कढीपत्ता घालावा, शिजवलेले शेंगदाणे फोडणी मध्ये घालून परतावे.
३) शेंगदाणे परतल्यावर लगेच त्यात चिरलेला पालक घालावा. गॅस मध्यम ठेवून पालक नीट शिजवून घ्यावा.
४) पालक शिजल्यावर त्यात घट्ट ताक घालावे आणि उकळी येईस्तोवर ढवळत राहावे, नाहीतर ताक फुटते. शेवटी चवीपुरते मीठ घालावे.

टिप : जर ताक जास्त आंबट नसेल तर चिंचेचा कोळ घालावा.

Labels:
spinach Curry, spinach recipe, palak recipe, palak healthy recipe, spinach healthy recipe